बीड - माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा अपघात झाला नसून तो घातपातच आहे, असा दावा समर्थक आणि नातेवाईकांमधून केला जात असतानाच आता एक तथाकथीत ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात मायकर नामक कार्यकर्त्याने ३ ऑगस्ट रोजी सुद्धा मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या आरोपांना दुजोरा मिळू लागला असून याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मेटे यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ १४ ऑगस्ट रोजी पहाटे अपघात झाला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक एकनाथ कदम व अंगरक्षक राम ढोबळे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मेटे समर्थक आणि त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. याच्या चौकशीसाठी आठ पथकेही नियुक्त केली आहेत. ही चौकशी सुरू असतानाच आणि मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच आण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक तथाकथीत ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात मायकर सांगतात की ३ ऑगस्ट रोजी सुद्धा मेटे यांच्या गाडीचा रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीने शिक्रापुरजवळ (जि.पुणे) पाठलाग केला होता. गाडीत ५ ते सहा लोक बसलेले होते. मागे-पुढे गाडी करत होते. तर टेम्पो हा आमच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे. या व्हायरल क्लीपने खळबळ उडाली आहे.
मी डॉक्टर असल्याने मला जे समजते त्यावरून काही गोष्टी खरोखरच अनाकलनीय आहे. ३ ऑगस्ट रोजीच्या घटनेची माहिती घेऊन ती गाडी आणि ही गाडी सारखीच आहे का, याची तपासणी व्हावी. लवकरात लवकर याचे सत्य बाहेर आले पाहिजे. मायकर यांच्याशी मी आणि माझा मुलगा बोललेलो आहोत. यात मायकरने देखील त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला आहे.
- ज्योती विनायक मेटे
हा अपघात नसून घातपातच आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण ३ ऑगस्ट रोजी सुद्धा साहेबांचा घातपात घडविण्याचा प्रयत्न झाल्याचे मायकरने सांगितले आहे. त्यामुळे याची लवकर चौकशी करावी.
- रामहरी मेटे, विनायक मेटे यांची भाऊ