बीड : मराठा समाजातील गरीब व दुर्बल घटकांचा विनायक मेटे चेहरा होते, त्यांनी मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी आयुष्य वेचले, अशा शब्दांत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भावना व्यक्त केल्या. २१ ऑगस्ट रोजी मेटे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ते बीडला आले होते. यावेळी कुटुंबीयांना धीर देताना ते देखील भावूक झाले.
विनायक मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी पहाटे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झाले. मेटे यांच्या बार्शी रोडवरील निवासस्थानी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कुटुंबीयाची भेट घेतली. त्यांचे अकाली जाणे वेदनादायी आहे. त्यांच्या पश्चात मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी व शिवसंग्रामच्या माध्यमातून उभे केलेले संघटन पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नीला विधानपरिषदेवर संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असून शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकरता पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही अडीअडचणीत आपण पाठिशी राहू, अशा शब्दांत त्यांनी मेटे कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे , बंधू रामहरी मेटे, मुलगा आशितोष मेटे यांच्याशी त्यांनी संवाद साधला.