परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील तसेच खा.डॉ. प्रीतम मुंडे संचालक असलेल्या येथील वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते विनोद अशोक सामत यांची गुरुवारी निवड करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते.
गुरुवारी सकाळी संचालक मंडळाची बैठक बँकेच्या येथील मुख्य कार्यालयात झाली. या बैठकीत वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे मुख्य कार्यालय परळी येथे असून बँकेच्या राज्यभर ४१ शाखा आहेत. ठेवी ९५० कोटींच्यावर आहेत. या निवडीचे बँकेचे संचालक व खासदार प्रीतम मुंडे व सर्व संचालकांनी स्वागत केले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सामत यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले व त्यानंतर गोपीनाथ गड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
१९६६ मध्ये परळीत रतिलाल मोमया व शहरातील इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन वैद्यनाथ अर्बन बँकेची स्थापना केली होती. विनोद सामत यांचे वडील स्व. अशोक सामत हे अनेक वर्षे वैद्यनाथ अर्बन बँकेचे अध्यक्ष होते. स्व. अशोक सामत हे लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू होते. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ अर्बन बँकेची भरभराट झाली. या बँकेचा राज्यभर कार्यविस्तार झाला. २०११ ते २०२१ दरम्यान १० वर्षे अशोक जैन हे बँकेचे अध्यक्ष होते. जुलैमध्ये त्यांनी राजीनामा दिला होता.
230921\img-20210923-wa0294_14.jpg~230921\img-20210923-wa0322_14.jpg