बीड : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना विविध आजारांनी घेरले आहे. सर्दी, ताप, खोकला यांसह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दिसत आहे. चिकुनगुनियाही डोके वर काढू पाहत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयासह खासगीमध्ये आजारी मुलांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले. तसेच जीवितहानीही होत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. या पावसामुळे हवेत गारवा आहे. तसेच अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. या बदलामुळेच लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला असे आजार होत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या १२ वर्षांपर्यंतच्या मुलांची गर्दी वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी मुलांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही केले. जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ. शंकर काशीद, डॉ. सूरज बांगर, डॉ. अबरार हाश्मी, डॉ. दीपाली नरवडे हे आलेल्या मुलांवर उपचार करीत आहेत.
--
ओपीडीत रोज ५० रुग्ण
जिल्हा रुग्णालयात सध्या सर्दी, ताप, खोकला असलेले जवळपास ५० रुग्ण रोज येत आहेत. यातील गंभीर असणाऱ्यांना वॉर्डात पाठवून ॲडमिट करून घेतले जात आहे. त्यांच्यावर परिचारिकांमार्फत लक्ष ठेवले जाते. तसेच डॉक्टरांकडूनही राउंड घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या वॉर्डात २५ रुग्ण दाखल असल्याचे समजते.
--
डेंग्यूच्या 'साथी'ला चिकुनगुनिया
अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ वाढली आहे. सरकारीसह खाजगी रुग्णालयात मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या लोकांना डेंग्यूने ग्रासल्याचे उदाहरणे पाहावयास मिळत आहे. असे असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यातच आता डेंग्यूच्या साथीला चिकनगुनियाही आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
--
सध्या रुग्णसंख्या वाढली आहे. रोज ५०पेक्षा जास्त मुले सर्दी, ताप, खोकला झाल्याने उपचारासाठी येतात. तसेच डेंग्यूचीही साथ आहे. पालकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. तसेच थोडीही लक्षणे जाणवताच मुलांना तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांकडे दाखवावे.
डॉ. शंकर काशीद, बालरोगतज्ज्ञ, बीड
--
रोज ओपीडीतील रुग्ण ५०
ॲडमिट असलेले रुग्ण २५