बीड : गेवराईतील गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. बीड तालुक्यातील बकरवाडी येथील जून २०२१च्या गर्भपाताच्या गुन्ह्यातील तारीख बीडच्या न्यायालयात २ जानेवारी रोजी होती. यात जालन्याचा सतीश गवारे आणि गेवराईची बडतर्फ अंगणवाडी सेविका मनीषा सानप यांची भेट झाली. याचवेळी त्याने मनीषाला एक साधा मोबाईल घेऊन दिला. त्यात दुसऱ्याच्या नावाचे सीमकार्ड टाकले. याच ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा गर्भलिंग निदान करण्याचा बाजार सुरू करण्याचा प्लॅन आखल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गेवराई शहरातील संजयनगर भागात ५ जानेवारी रोजी पोलिस व आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवून अवैध गर्भलिंग निदान प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात मनीषा सानप, घर मालक चंद्रकांत चंदनशिव आणि जालन्याचा सतीश गवारे यांच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील गवारे हा घटनास्थळावरून फरार झाला होता तर मनीषा व चंदनशिव पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची गुरुवारी सहा दिवसांची पोलिस कोठडी संपत असून, त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सोनोग्राफी मशीन तपासणीलाज्या ठिकाणी गर्भलिंग निदान तपासणी झाली होती, त्याच ठिकाणाहून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली होती. ही मशीन तपासणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे यांना पोलिसांनी पत्र दिले आहे. डॉ. बडे यांनीही रेडिओलॉजिस्टसह तिघांची समिती मशीन तपासणीसाठी नियुक्त केली आहे. त्यानंतर पोलिसांना अहवाल दिला जाणार आहे.
औषधी गर्भपाताचीच; ‘एफडीए’चा अहवालगर्भलिंग निदानानंतर मुलगी असल्यास लगेच गर्भपात करण्याचीही तयारी आरोपींची होती. त्यादृष्टीने घटनास्थळी साहित्य व गर्भपाताच्या गोळ्या, औषधी सापडल्या होत्या. या गोळ्यांची तपासणी करून याने गर्भपात होऊ शकतो, असा अहवाल औषध प्रशासनाने दिला आहे. तर या औषधी कोठून आल्या? याचा शोध सुरू असल्याचे पत्र ‘एफडीए’ने पोलिसांना दिले आहे.
मोबाइल गवारेकडेचमनीषा आणि गवारे यांची २ जानेवारी रोजी बीडच्या न्यायालयात भेट झाली होती. याचठिकाणी गवारे याने दुसऱ्याच्या नावावरील सीमकार्ड असलेला मोबाइल मनीषाला दिला होता. तो माेबाइल सध्याही गवारे याच्याकडेच आहे. तो फरार असून, दोन पथके शोध घेत आहेत. तर अटकेतील मनीषा व चंदनशिव यांची पोलिस कोठडी संपत असून, गुरुवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच सोनोग्राफी मशीन तपासणीसाठी आरोग्य विभागाला पत्र दिले आहे.-संतोष जंजाळ, सहायक पोलिस निरीक्षक, गेवराई