बीड : म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे तब्बल आठ लोकांनी आपला एक डोळा गमावला आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत ९० शस्त्रक्रिया पार पडल्या असून, यात ८ डोळ्यांच्या, तर ८२ कान, नाक, दात आदींच्या आहेत. म्युकरमायकोसिस हा आजार दिवसेंदिवस घातक ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. १३ मे रोजी पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. आतापर्यंत ही संख्या तब्बल १४४ वर गेली आहे. ज्यांना हा आजार जडला आहे, त्यांच्यावर जिल्ह्यात केवळ अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार होतात. संशयितांना येथे दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी होते. निदान होताच सर्व तपासण्या करून त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय येथील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात. आतापर्यंत तब्बल ९० रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ईएनटीच्या सायनसमधील इन्फेक्शन काढण्यासाठी सायनस डिब्राईटमेंट सर्जरी केली जाते. अशा आतापर्यंत ८२ शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे पार पडल्या आहेत. तसेच ८ रुग्णांच्या डोळ्यात संसर्ग झाल्याचे दिसले होते. त्यांचा एक डोळा काढण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या शस्त्रक्रियेतून १८ रुग्णांना सुटीही देण्यात आली आहे. दुर्दैवाने आतापर्यंत येथे २२ मृत्यूची नोंदही झाल्याचे सांगण्यात आले.
--
या टीममुळे शस्त्रक्रिया यशस्वी
स्वारातीत शस्त्रक्रिया करण्यात नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. भास्कर खैरे, डॉ. एकनाथ शेळके, डॉ. अंकिता, डॉ. केतकी, डॉ. पूजा, इएनटी विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सुधीर भिसे, डॉ. शंकर कोठुळे, मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. सचिन चौधरी, डॉ. विशाल लेडे, भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. गणेश निकम, डॉ. देवानंत पवार, डॉ. अपर्णा कुलकर्णी, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश काशीद व संबंधित विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडत आहेत. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे हे मार्गदर्शन करून आढावा घेतात.
--
१७ रुग्ण प्रतीक्षेत, तर पाचजणांच्या शस्त्रक्रिया अशक्य
स्वारातीत रोज सरासरी पाच ते सहा शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. बुधवारपर्यंत १७ रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते, तर पाच रुग्णांना जास्त संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. आता त्यांना शेवटचा पर्याय म्हणून केवळ औषधोपचार दिला जात आहे.
---
आतापर्यंत १४४ रुग्ण आढळले असून, ९० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पैकी ८ रुग्णांचा एक डोळा काढावा लागला आहे. सर्व विभाग शस्त्रक्रियेसाठी परिश्रम घेत आहेत. रोज सरासरी पाच ते सहा शस्त्रक्रिया केल्या जातात. डोळ्यासाठी दीड ते दोन तास, तर ईएनटीसाठी तीन ते चार तास वेळ लागतो.
डॉ. भास्कर खैरे, नेत्रविभाग प्रमुख, स्वाराती वैद्यकीय महा. अंबाजोगाई
---
अशी आहे आकडेवारी
एकूण रुग्ण १४४
शस्त्रक्रिया झालेले ९०
शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत १७
शस्त्रक्रिया करण्यास अशक्य असलेले ५
मृत्यू २२
रेफर (स्वत:च्या सोयीने गेलेले) ४
बरे झालेले १८
स्वइच्छेने निघून गेलेले ७
एक डोळा काढलेले ८
---
एकूण वॉर्ड ३
एकूण खाटा ९०
शस्त्रक्रिया गृह २
===Photopath===
090621\09_2_bed_12_09062021_14.jpg
===Caption===
डॉ.भास्कर खैरे, नेत्रविभाग प्रमुख, स्वाराती अंबाजोगाई