शिरूर कासार : काही दिवसांपूर्वी एका विवाहितेचे मंगळसूत्र आजोळ प्रकल्पाच्या परिसरात शेताकडे जनावरे घेऊन जाताना हरवले होते. दोन दिवस शोधाशोध करूनही ते सापडले नाही.
आजोळ प्रकल्पाच्या परिसरात झाडे लावलेली असून, त्यांना संरक्षणासाठी जाळ्या उपलब्ध नसल्याने आजोळ प्रकल्पातील एक निराधार व मूक असणारे बाबा झाडे जनावरांनी खाऊ नयेत, म्हणून परिसरात देखभाल करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी बाबा त्या परिसरात फिरत असताना त्यांना ते मंगळसूत्र दिसून आले. त्यांनी तत्काळ आजोळात येत ते कर्ण तांबे यांच्याकडे सुपूर्द केले. बोलता येत नसल्याने जास्त समजून घेता आले नाही.
मंगळसूत्र हरवलेली विवाहिता माहीत असल्याने तांबे यांनी तत्काळ तिच्या पतीशी संपर्क केला व सापडलेल्या मंगळसूत्राची माहिती दिली. वर्णन विचारून व फोटो पाठवून खात्री करून घेतली. या विवाहितेचा पती गुरुवारी आजोळात मंगळसूत्र घेऊन जाण्यासाठी आनंदाने सर्वांना पेढे, येथील निराधारांसाठी किराणा साहित्य घेऊन आला. ज्या बाबांनी ते सोने प्रामाणिकपणे आणून आजोळ परिवारात दिले, त्यांचा सत्कार केला. आजोळ परिवारात परिस्थितीने गांजलेले निव्वळ निराधार, दिव्यांग, अंध, मतिमंद व्यक्ती असून, त्यांच्यातील प्रामाणिकपणाचा आदर्श घेण्याजोगा असाच आहे. अशा व्यक्तींना मायेचे दोन घास भरविताना मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया कर्ण तांबे यांनी दिली.
160921\img-20210916-wa0008.jpg
फोटो