नवीन मतदार याद्या तयार झाल्या असून, त्यात वाॅर्डनिहाय नोंदणी केलेल्या मतदाराबाबत काही आक्षेप असल्यास ते लिखित स्वरूपात सोमवारपर्यंत सादर करावेत, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सोमवारपर्यंत तब्बल १९७ आक्षेप आले. विशेषकरून यात मतदार यादीत या वाॅर्डातून त्या वाॅर्डात समावेश असल्याच्या तक्रारी असून, आपण या वाॅर्डात निवासी असल्याने मतदानदेखील त्याच वाॅर्डात करण्याची इच्छा असल्याने बदल करावा, असाच काहीसा सुरू आहे. यादीत बदल हे सोयीनुसार इच्छुक उमेदवारांनी वा जुन्या जाणकार लोकांकडून केले गेले ते अमान्य करत मतदान वाॅर्ड पसंती दाखवली आहे. २०११ च्या मतदार यादीला ग्राह्य धरत नवीन नोंदणीकृत मतदाराची भर पडली. शिरूरची लोकसंख्या ५,८०६ इतकी असून, त्यात मतदार संख्या ४,८२१ आहे, पुरुष मतदार २,५१९, तर महिला मतदार संख्या २,३०२ इतकी आहे. आक्षेपांचा निपटारा करण्यासाठी सर्वसंमतीने याद्या बनविण्याचे काम सुरू झाले आहे.
संबंधित आक्षेपांची सत्यता पडताळून मतदारांना न्याय देण्यात येणार असून, ८ मार्च रोजी मतदान केंद्र व त्यात असणारे मतदार यांच्या अंतिम याद्या लावल्या जाणार असल्याचे नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.
पहिली मुदत संपलेली असून आता दुसऱ्या टर्ममधे गाव कारभारी होण्यासाठी जुन्याबरोबर नवीनसुद्धा नेटाने कामाला लागले असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक जण आपला आधारवड शोधत आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा आधार मिळाला नाही, तर स्वतंत्र अशीसुद्धा तयारी असल्याचे बोलले जात आहे.