बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघात ७ ते ९ या पहिल्या दोन तासात ६.८८ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान आष्टी मतदार संधात झाल्याची नोंद आहे. सकाळची गुलाबी थंडी असल्याने लोक घरातच थांबल्याचे यावरून दिसत आहे. आता यानंतर मतदानाचा टक्का वाढेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात बीड, आष्टी, माजलगाव, केज, परळी आणि गेवराई अशी सहा मतदार संघ आहेत. प्रत्येक मतदार संघात चुरशीच्या लढती पहायला मिळत आहेत. १४ दिवस प्रचार केल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजताच मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण ६.८८ टक्के मतदान झाले. यामध्ये आष्टी ८.६६ टक्के, बीड ७.१५, गेवराई ६.९०, केज ५.८१, माजलगाव ५.६०, परळी ७.८ टक्के मतदान झाले आहे.
परळीत कॅमेरे बंद असल्याने वादपरळी मतदार संघात मतदान केंद्रातील कॅमेरे बंद असल्याने वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. याचा एक कथीत व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. इतर मतदार संघात शांततेत मतदान सुरू होते.