पोलिसांचा ताफा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतीपैकी ११८ ग्रामपंचायतीसाठी उद्या (दि. १५) मतदान होत आहे. १८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. ४१३ प्रभागांतील १०५१ जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून जवळपास २११८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १९३ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.
सर्वाधिक २९ ग्रामपंचायतीसाठी बीड तालुक्यात तर त्याखालोखाल केज २३, गेवराई २२, आष्टी १२, पाटोदा ९, अंबाजोगाई ७, परळी ७, माजलगाव ५, शिरूरकासार ८, वडवणी २, धारूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे.
३६४२ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. ३३ पत्र अवैध ठरली तर १४६१ नामनिर्देशन पत्र मागे घेण्यात आले होते. आता २११८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. सर्वाधिक ४१० उमेदवार बीड तालुक्यात असून गेवराई ३८६, माजलगाव १२८, वडवणी ३३, धारूर १०१, केज ३८३, अंबाजोगाई ६६, परळी १०७, पाटोदा १८७, आष्टी १७८, तर शिरुर तालुक्यात १३९ उमेदवार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सर्वांना प्रशासनातर्फे आदेशित केले आहे.
१२९ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. १८ ग्रा.पं. बिनविरोध झाल्या. १९३ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. केज तालुक्यात सर्वाधिक ४२ उमेदवार बिनविरोध आले.
सोमवारी मतमोजणी
सोमवारी (दि. १८) तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे.
पोलीस बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. जलद प्रतिसाद पथक, ५ आरसीपी प्लाटून ह्या मतदान सुरळीत होण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस अंमलदार व होमगार्ड देण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी झोनल पेट्रोलिंग अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.
मतदानाची सर्व तयारी पूर्ण
बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती. १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता १११ ग्रामपंचायतसाठी ही निवडणूक होत असून उद्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. सर्व तयारी आणि नियोजन झाले असून कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या ड्युटीवर रवाना झाले आहेत.
- प्रकाश आघाव पाटील,
निवडणूक निर्णय अधिकारी