राम लंगे
वडवणी : वडवणी तालुका असूनही येथे आरोग्य सुविधा कसल्याच नाहीत. त्यातच कोरोनासारखी महामारी असतानाही या तालुक्यात व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजन बेडही उपलब्ध नाहीत, तसेच सिटीस्कॅन अथवा इतर महत्त्वाच्या तपासण्या करावयाच्या असतील तर थेट बीडला हेलपाटे मारावे लागत आहेत. यात नागरिकांचे हाल होत आहेत.
तालुक्यात चिचंवण येथे ग्रामीण रुग्णालय असून, वडवणी व कुप्पा येथे प्राथमिक आरोग्य संस्था आहेत; मात्र याठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. प्राथमिक उपचारासाठी जेमतेम खासगी रुग्णालय आहेत; मात्र खासगी रुग्णालयातदेखील सोनोग्राफी सेंटर, सिटीस्कॅन तपासणी, डिजिटल एक्स रे मशीन, या सुविधा उपलब्ध नसल्याने संशयित कोविड रुग्णांची सिटीस्कॅन तपासणी करण्यासाठी थेट बीड प्रवास करावा लागत आहे, तसेच सध्या कोरोना बाधित व संशयित रुग्णांचा सिटीस्कॅन करण्यासाठी रोज बीडचा रस्ता गाठावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड बसत असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व सुविधा तालुक्यातच उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
किमान तात्पुरती तरी सुविधा द्या
कोरोनाबाधित व संशयित रुग्ण आगोदरच घाबरलेले असतात. त्यातच त्यांना ३५ ते ५० किमीचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांना त्रास होत आहे. यामुळे ते आणखीनच गंभीर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी सिटीस्कॅनसह इतर सर्व मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
--
तालुक्यातील एकूण गावे ४६
एकूण कोविड सेंटर ३
सध्या उपचार घेणारे रुग्ण ४००