बीड : वक्फ बोर्डच्या ४०९ एकरच्या ( Wafq Land Scam ) गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उजेडात येण्यास सुरुवात झाली आहे. यातील दहा एकर जमीन धुळे-सोलापूर महामार्गाला चिकटून आहे. चौपदरीकरणात सुमारे १५ कोटींचा मावेजा आला होता. तो ढापण्यासाठी अवघ्या सव्वा कोटी रुपयांत वक्फ बोर्डची जमीन खालसा करुन खासगी लोकांच्या घशात घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हवाला रॅकेटच्या माध्यमातून हा आर्थिक व्यवहार झाल्याचा आराेप आहे.
वक्फ बोर्ड अंतर्गत हजरत शहनशाहवली दर्गाची निजामकाळापासून ७९६ एकर ३७ गुंठे जमीन आहे. यापैकी काही जमिनी खिदमतमाश म्हणून सेवेकऱ्यांना दिलेल्या आहेत. मात्र, २०१६ मध्ये बनावट कागदपत्रे तयार करुन मूळ सातबारावरील दर्गाचे नाव कमी करुन त्या ठिकाणी हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी (रा. सिडको एन १२ प्लॉट क्र. १४ औरंगाबाद) व त्याच्या इतर नातेवाइकांच्या नावे केली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ साठी दर्गाची सर्व्हे क्र. २२ व ९५ मधील जमीन संपादित केली होती. तेथे दर्गाची एकूण दहा एकर जमीन आहे. मावेजापोटी १५ कोटी रुपये आले होते. ते हडप करण्यासाठी संपूर्ण दहा एकर जमीन अवघ्या एक कोटी ३० लाख रुपयांत हबीबोद्दीन सिध्दीकी व इतरांना विक्री केली गेली. हा सगळा गैरव्यवहार तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भूसुधार) प्रकाश आघाव पाटील , तत्कालीन तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ज्या जमिनीचा भूसंपादनाचा मावेजाच १५ कोटी आला आहे ती अवघ्या सव्वा कोटी रुपयांत खासगी लोकांच्या घशात घातल्याचे उघड झाल्याने हा घोटाळा नियोजनपूर्वक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींचे पोलिसांना असहकार्यआर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. व तपास अधिकारी हरिभाऊ खाडे यांनी तपासकामी २ रोजी समक्ष हजर रहा, अशी नोटीस आरोपींना बजावली होती. मात्र, एकही आरोपी चौकशीसाठी पुढे आला नाही. केवळ तिघांचे नातेवाईक कागदपत्रे घेऊन आले होते. यातून आरोपींचे पोलिसांना असहकार्य असल्याचे समोर स्पष्ट झाले आहे.
तपास सुरु आहे या घोटाळ्याच्या अनुषंगाने महसूल विभागाकडे काही कागदपत्रे मागितलेली आहेत. ती सोमवारपर्यंत येतील, अशी अपेक्षा आहे. वक्फची बीडसह गेवराई व माजलगाव तालुक्यात जमीन आहे. तेथील कागदपत्रेही मागवली आहेत. सखोल तपास सुरू आहे.- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड.