- पुरूषोत्तम करवा, सुशांत आगेमाजलगाव : सध्या अधिकमास सुरू असल्याने व शनिवारी कमला एकादशी आल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी पुरुषोत्तम पुरी या ठिकाणी एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांना दर्शनासाठी ६-६ तास वेळ लागला. यावेळी अनेक सामाजिक संघटनेने भाविकांच्या फराळाची सोय केली होती.
दर तीन वर्षांनी येत असलेल्या अधिक मासानिमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. शनिवारी अधिक मासातील एकादशी आल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. एकादशीचे औचित्य साधून भाविकांनी कमला एकादशीचे गोदावरी नदीपात्रात स्नान करून दर्शन घेतले. आजचा योग हा दर्शनासाठी चांगला मानला जात असल्याची भावना यावेळी भाविकांमधून बोलली जाऊ लागली होती.
शनिवारी एकादशी व मोहरम निमित्त सुट्टी आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. भाविकांना ५ ते ६ तास दर्शनासाठी रांगेत उभा राहावे लागले. दोन दिवसापासून पाऊस नसल्यामुळे भाविकांना आनंदात दर्शन घेता आले. यावेळी अनेक सामाजिक संघटनेने भाविकांच्या फराळ, पाण्याची सोय केली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. प्रशिक्षणार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी श्वेता खाडे या ठिकाणी दिवसभर उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांनी अनेक भाविकांसोबत हुज्जत घातल्याचे प्रकार देखील यावेळी पहावयास मिळाले.