लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी १०८ रुग्णवाहिका धावत आहेत. तसेच सामान्य रुग्णांसाठीही त्या धावतात. वास्तविक पाहता जिल्ह्यात केवळ १९ रुग्णवाहिका असल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दररोज जवळपास १५० पेक्षा जास्त कॉल येत असले तरी यातील ३० ते ४० टक्के लोकांनाच सेवा मिळत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर संख्या झपाट्याने वाढत गेली. रुग्णसंख्या वाढत गेल्याने त्यांना ने-आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली. सुरूवातीला ५ रुग्णवाहिका होत्या. नंतर ही संख्या वाढून १४ करण्यात आली. या रुग्णांमुळे इतर आजार असलेल्या रुग्णांना याची सेवा देण्यास अडचणी येत होत्या. परंतु तरीही या रुग्णवाहिका जिल्हाभरात दिवसरात्र धावून सामान्यांना अडचणीत मदत करून रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करत होत्या. अपघात व इतर गंभीर रुग्णांना वेळेत पोहोचविल्याने अनेकांचे प्राण वाचले होते.
दरम्यान, मागील तीन महिन्यात दीड हजार कोरोनाबाधितांना सेवा देण्यात आली आहे. यात सर्वात जास्त मार्च महिन्यात या रुग्णवाहिका धावल्या आहेत. सामान्यांसाठीही या रुग्णवाहिका धावल्या आहेत.
एका रुग्णाला रुग्णालयात सोडेपर्यंत दुसऱ्याला प्रतीक्षेत
जिल्ह्यात ‘१०८ ॲम्ब्युलन्स’ संख्या केवळ १९ आहे. लोकांची वाढती मागणी पाहता ही संख्या खूपच अपुरी आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढल्याने काही रुग्णवाहिका बाधित व संशयितांच्या सेवेसाठी धावत आहेत.
विशेष म्हणजे १९पैकी १४ रुग्णवाहिका या कोविडसाठी राखीव ठेवल्या असून, इतर ५ रुग्णवाहिका सामान्य रुग्णांसाठी धावतात. असे असले तरी या रुग्णवाहिकांनी मागील तीन महिन्यात ४ हजार रुग्णांना सेवा दिली आहे.
अशातच रुग्णवाहिका कमी असल्याने एखादा कॉल आल्यावर त्याला प्रतीक्षेत ठेवले जाते. पहिल्या कॉलवरील रुग्णाला रुग्णालयात दाखल करून ही रुग्णवाहिका प्रतीक्षेतील रुग्णाच्या सेवेसाठी धावत असल्याचे समन्वयक अविनाश राठोड यांनी सांगितले.
ग्रामीणमधून १०८ रुग्णवाहिकेला मागणी
शहरांपेक्षा ग्रामीण भागातून येणारे कॉल सर्वाधिक आहेत. शहरातील लोक १०८ रुग्णवाहिकेची वाट पाहण्यापेक्षा खासगी अथवा स्वत:च्या वाहनातून रुग्णाला रुग्णालयापर्यंत पाेहोचवत असल्याचे सांगण्यात आले.