अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जेथे काम मिळेल तेथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघाती प्रसंग ओढावल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे.
वाहनांच्या गतीवर नियंत्रण हवे
अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबा साखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालविली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत चालला आहे. तरीही या भरधाव वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हातपंप दुरुस्तीची मागणी
आष्टी : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपांवर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. मात्र काही ठिकाणच्या योजना अद्यापही रखडलेल्या आहेत. भारनियमनाच्या कालावधीत अनेक गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त हातपंप दुरुस्तीची मागणी आहे.
पुलांना कठडे बसविण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये विकले आहेत. त्यामुळे पुलाचे कठडे गायब झाले आहेत. यापूर्वीही कठडे नसलेल्या पुलांवर अनेक वाहनचालक पडलेले आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुलांना कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
दारूची विक्री बंद करण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी आणि नागरिकांनी दारूबंदीची मागणी केली आहे. मात्र, याकडे अद्यापही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. याबाबत पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.