परळी : सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन चालू होते. तर तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दुसऱ्या दिवशी रात्री साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ७ सप्टेंबरपासून साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून गावातील महिला, लहान मुले, तरुण, ज्येष्ठ सहभागी झाले आहेत. गुरुवारी रात्री धरणे आंदोलनात भजन करून जागर करण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही व मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत अखंडपणे हे साखळी धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार दादावडगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
गुरुवारी मध्यरात्री परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यांनी भेट देऊन आता झोपा, असे दरडावून सांगितल्याने आंदोलक संतप्त झाल्याचा प्रकार घडला.
परळीच्या तहसील कार्यालयासमोर २०१८ मध्ये आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठीच त्याच मैदानावर पुन्हा हे आंदोलन गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे.