लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे विविध भागात शेती व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत.
रविवारी सायंकाळपर्यंत बीड तालुक्यातील अनेक गावांमधील शेतशिवारांना शर्मा यांंनी भेट देऊन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. या अतिवृष्टीमुळे लहान मोठे बंधारे व तलाव फुटल्यामुळे शेतात पाणी शिरल्यानेदेखील नुकसान झाले आहे. तालुक्यातील कुर्ला शिवारातून येथून सिंदफणा नदीचा प्रवाह आहे. या नदीवर बंधारा आहे. औरंगपूर येथील हा बंधारा ४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री भिंतलगत मातीभराव फुटल्याने नदीचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे शेतातली माती वाहून गेली आहे. याठिकाणी रविवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी याठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, बीडचे तहसीलदार शिरीष वमने, जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित परांडे यांच्यासह इतर अधिकारी या पाहणी दौऱ्यात होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तत्काळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी केली.
....
फेरपंचनामे करण्याचे आदेश
ज्याठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे केले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने नदीचा प्रवाह बदलला आहे. शेतात पाणी शिरल्याने शेतातील मातीसह पिके वाहून गेली आहेत. या सर्वांचे पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत.
120921\12_2_bed_16_12092021_14.jpg~120921\12_2_bed_15_12092021_14.jpg
सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ~नदीच्या पाण्यामुळे वाहून गेलेल्या शेतात पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांचे पथक