आष्टी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सकाळी आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात केली. पालकमंत्री मुंडे यांनी अवघड जागेतून वाट काढत, चिखल तुडवत नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुंडे यांनी मराठवाडी येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगाव, गंगादेवी या गावांची पाहणी करताना शेतातून वाहून गेलेल्या बाजरी, सोयाबीन, आदी पिकांची शेतांवर जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ. शिवाजी राऊत, सतीश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पाहणीनंतर शेतीची, विहिरीची, रस्त्यावरील पुलांची, घरांची पडझड, मोठे नुकसान झाले आहे. लवकरच पंचनामे करून नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
नुकसानीचे संयुक्त पंचनामे होणार
आता नुकसानीचे पूर्वीप्रमाणे पंचनामे न करता महसूल, कृषी व विमा कंपनीचे असे तीनही अधिकारी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. त्यानुसार जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
020921\img-20210902-wa0345_14.jpg~020921\img-20210902-wa0342_14.jpg