वडवणी : तालुक्यातील वडवणी ते कवडगाव या मुख्य रस्त्यावर मामला तलाववरील पुलाचे कठडे तुटल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असल्याने पूल धोकादायक बनला आहे.
वडवणी तालुक्यातील जवळपास १५ गावांना जोडणारा कवडगाव रस्ता आहे. या रस्त्यावरून मामला, साळिंबा, पिंपरखेड, मोरेवाडी, देवडी, लिमगाव, काडीवडगाव, देवगाव, चिंचवडगाव, खापरवाडी, परडी माटेगाव लवूळ क्र. २ सह अन्य गावांतील वाहनधारकांना या मार्गाने जावे लागत आहे. वडवणीपासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या मामला तलाव परिसरातील धोकादायक वळणावरील पुलाचे कठडे गायब झाल्याने व तुटल्यामुळे पुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तत्काळ या पुलावर कठडे बसविण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.