वृक्षतोड थांबवावी
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही, अंमळनेर, वैद्यकिन्ही, निरगुडी, नायगाव या परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वृक्षमित्रांमधून केला जात आहे. वृक्षतोड थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नो पार्किंगच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक वाहने लावत आहेत. त्यामुळे परिसर विद्रूप दिसत आहे. इतरांना नियम दाखविणारे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे मात्र कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
रिक्षातून अवैध वाहतूक
वडवणी : बीड, वडवणी, तेलगाव या महामार्गावर रिक्षा, जीपमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक शाखेने या भागातही विशेष मोहीम राबवून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
विजेचा लपंडाव
बीड : शहरातील स्वराज्यनगर, मित्रनगर, बार्शी रोड परिसरातील वीज अनेकदा जात आहे. महावितरणकडून याचे कसलेही नियोजन केले जात नसल्याचा आरोप या भागातील रहिवाशांनी केला आहे. वेळेवर बिले भरूनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.