'युद्ध पेटले, आमचे करिअर थांबले',युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 07:23 PM2022-03-10T19:23:01+5:302022-03-10T19:25:06+5:30
बीड जिल्ह्यासह राज्यातील जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस होण्यासाठी गेलेले होते. सद्य:स्थितीत तेथे युद्ध सुरू असल्याने हे विद्यार्थी आपापल्या गावी परतत आहेत.
बीड : युक्रेन हा अतिशय सुंदर देश आहे, तेथील लोकसुद्धा चांगले आहेत. युद्ध सुरू झाल्याने तेथून मायदेशी परतावे लागले. मात्र माझे संपूर्ण करिअर आता थांबले आहे. एमबीबीएसचे चौथे वर्ष सुरू होते. आता पुन्हा युक्रेनला जाणे होईल की नाही याची शाश्वती नाही, त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची भारतात सोय करावी, अशी इच्छा युक्रेनहून परतलेला बीड येथील विद्यार्थी आकाश कल्याण बावळे याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
बीड जिल्ह्यासह राज्यातील जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस होण्यासाठी गेलेले होते. सद्य:स्थितीत तेथे युद्ध सुरू असल्याने हे विद्यार्थी आपापल्या गावी परतत आहेत. आकाश बावळे म्हणाला, एमबीबीएसचे चौथे वर्ष सुरू असताना युक्रेनमधील परिस्थितीमुळे परतावे लागले. त्यामुळे माझे करिअरच थांबले आहे. भारत सरकारने आमच्या पुढील शिक्षणाबद्दल गांभीर्याने विचार केला नाही, तर आम्हाला पुढील शिक्षणासाठी पुन्हा युक्रेनला जावे लागेल. त्या देशात आता जाण्याची इच्छा नाही; परंतु आमच्या शिक्षणाची सोय झाली नाही, तर नाइलाजाने पुन्हा तेथे जाऊन शिक्षण घ्यावे लागेल. युद्ध कधी थांबेल, तेथील सर्व काही केव्हा सुरळीत होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच आमच्यासाठी काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले.
चौघेही परतले
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले बीड जिल्ह्यातील चारही जण सुखरूप परतले आहेत. माजलगाव येथील अनिल कुमार तेजरमा हा सर्वांत आधी पोहोचला. त्यापाठोपाठ गेवराई येथील हाश्मी अंदलीब मेराज, बीड येथील आकाश कल्याण बावळे व आष्टी येथील अनिकेत भाऊसाहेब लटपटे हे भारतात टप्प्याटप्प्याने आले.
नेक्सट परीक्षा होणार सुरू
रशिया-युक्रेनमधून एमबीबीएस करून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करायची असेल तर पूर्वी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन (एफएमजीई) ही परीक्षा द्यावी लागत असे. मात्र आता पुढील वर्षापासून नॅशनल एक्झिट टेस्ट (नेक्सट) ही परीक्षा द्यावी लागणार आहे.