शिरूर कासार : आपल्या घराची असो वा आपण जिथे आहोत तिथली स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. या जाणिवेतून शासकीय रुग्णालयात आईची सुश्रूषा करत असतानाच स्वच्छतेचे भान ठेवून वाॅर्डही स्वच्छ करण्यासाठी तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब येथील बाळासाहेब नागरे हे हातात झाडू घेऊन वाॅर्ड सफाई करत अन्य रुग्ण नातेवाईकांना स्वच्छतेचा संदेश देत आहे. बाळासाहेब नागरे यांची आई सध्या बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. आईसोबत बाळासाहेब नागरे थांबले असताना स्वच्छतेबाबत आधी केले, मग सांगितले म्हणत हातात झाडू घेऊन त्यांनी वाॅर्ड सफाई केली. रुग्णालय रुग्णांना पुनर्जन्म देत असते. त्यासाठी आईच्याच भावनेतून प्रत्येकांनी तेथील स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आवाहन यावेळी रुग्ण नातेवाईकांना त्यांनी केले.
भगव्या ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी व अभिवादन
शिरूर कासार : रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे एकमेव सर्वोत्तम उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिले जाते. सहा जूनरोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा स्तरावर शिवस्वराज्य दिन प्रथमच साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने भगव्या ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन केले जाणार असल्याचे शासनाकडून आदेशित केले आहे. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन करून कार्यक्रम आयोजित करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पत्राद्वारे आदेशित केले आहे. या अभिवादन सोहळ्यास नागरिकांनी देखील उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षण अधिकारी जमीर शेख यांनी केले आहे.
पावसाचा दोन दिवस खाडा, गुरुवारी पुन्हा आगमन
शिरूर कासार : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. शेती मशागतीसाठी पोषक असा पाऊस पडला. मात्र बुधवारी दिवसभर व सायंकाळी सुध्दा खाडा केला असला तरी, गुरुवारी आभाळ झाकाळून आले आणि पावसाचे आगमन झाले आहे.
दिव्यांगांचे लसीकरण, नोंदणीची गरज नाही
शिरूर कासार : शनिवारी दिव्यांग लोकांचे लसीकरण होणार असून त्यासाठी कुठलीही नोंदणीची गरज नाही. ४५ वय मर्यादा असलेल्या दिव्यांगांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्यासाठी फक्त दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दिव्यांग लोकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
शेती अवजारे दुरुस्तीची लगबग
शिरूर कासार : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी दमदार पावसाने हजेरी लावली. पेरणीपूर्व मशागत मोगडा, पाळी करण्यासाठी शेती अवजारे दुरुस्तीसाठी सुतारकाम करणारे व लोखंडी अवजारे दुरुस्तीसाठी कारागीराकडे शेतकरी येत असून अवजारे दुरुस्त करून घेण्यात व्यस्त दिसून येत आहेत.
===Photopath===
040621\vijaykumar gadekar_img-20210604-wa0020_14.jpg