बीड : कृषी हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत मध्यम पाऊस व १४ ते १६ मार्च या कालावधीत बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच आष्टी व गेवराई तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटचा इशारा परभणी येथील प्रादेशिक कृषी हवामान केंद्राने दिला आहे. त्यानुसार पुढील पाच दिवसांत मध्यम पाऊस व १४ ते १६ मार्च या कालावधीत बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई, हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, फळे आणि भाजीपाला यासारखी पिके लवकरात लवकर काढावीत. काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी. पावसाची शक्यता तसेच वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या झाडांना आधार देण्याची व्यवस्था करावी. मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपिटीच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. तसेच मका पिकामध्ये अंतर मशागत करावी, असे आवाहन कृषी अधीक्षक जेजुरकर यांनी केले आहे.