पुन्हा पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची कोंडी
शिरूर कासार : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पुरते घायाळ केलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला गेल्याने कोंडी झाली आहे. आता पाच दिवसांची उघडीप असून, याच काळात आपली शेतकामे उरकून घ्यावीत. पुन्हा पाऊस सक्रिय होणार असल्याचे सांगितले गेले असल्याने कामाचा उरक कसा होणार, मजुरांची वानवा या विवंचनेत शेतकरी धास्तावला आहे.
कोरोना बुधवारी शुन्यावर, तरी डोके वर काढतोच
शिरूर कासार : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाचा आकडा तालुक्यात एक अंकावर फिरत आहे. कधी निरंकदेखील असतो. पोळ्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. बुधवारी तालुका निरंक राहिला असला तरी अजूनही कोरोनाने शिव सोडली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगून सुरक्षित राहण्यासाठी नियमावलीचा उंबरठा ओलांडू नये, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.
तुरीच्या पिकाला उन्हाची पिडा
शिरूर कासार : यंदा तालुक्यात तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला असून, पडलेल्या पावसामुळे पीक जोमदार दिसत असून, त्याला आता फुल झोंबू लागले. मात्र, या अवस्थेत तुरीच्या पिकाला उन्हाची पिडा लागली असून, तुरीची झाडे जाग्यावरच वाळून जात असल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक संकट उभे ठाकले आहे. उन्हापासून पिकाला वाचविण्यासाठी झाडाच्या बुडाला उन्ही अळी नष्ट करण्यासाठी कीटक नाशक टाकून शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपड करत आहे.