- प्रभात बुडूख
बीड : जिह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाच्या व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जलसंधारणाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘जलशक्ती’ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवला जाणार असून, यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
‘जलशक्ती’ योजनेद्वारे पाणी बचत व जलपुनर्भरण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपरिक पाण्याच्या स्त्रोत जिवंत करणे तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे पाणी एकत्र करुन जल पुनर्भरण करण्यात येणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवला जाणार असून राज्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे जिल्ह्यात राबवण्यात आली आहे. या योजनेचा परिणाम देखील चांगला दिसून आला आहे. तसेच पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमुळे त्या परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जलयुक्त योजनेच्या धरतीवर केंद्राच्या ‘जलशक्ती’ योजनेचा समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार आहे.
‘मन की बात’ कार्यक्रमात बीडचा उल्लेख जलशक्ती योजनेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये माहिती दिली. यावेळी हा कार्यक्रम देशभरात राबवला जाणार असून, महाराष्ट्रातील ८ जिल्ह्याचा समावेश आहे. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला व हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्यावर जिल्ह्यातील दुष्काळावर मात करता येऊ शकते असे देखील ते यावेळी म्हणाले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा प्रशासन लागले कामालाकेंद्र शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, जलसंधारण तसेच संबंधीत सर्व विभागत योजनेचा शुभारंभ करण्यापुर्वी करण्यात येणाऱ्या तयारीला लागले असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांचा समावेश जलशक्ती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, बीड, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.