बीड : शहरातील एमआयडीसी भागाकडील आयोध्यानगरात १० ते १५ दिवसांतून एक वेळ नळाला पाणी येते. सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत पालिकेकडे वारंवार मागणी करण्यात आली; परंतु यावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील रहिवाशांमधून पालिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.
शहरात सध्या सर्वत्र पाण्यासाठी नागरिकांची ओरड आहे. नव्याने होत असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. तर जुनी पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरेसे आणि गतीने पाणी पोहोचत नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव आणि पालीच्या धरणात मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजन नसल्याने शहरवासीयांच्या घशाला कोरड पडत आहे. त्यामुळे आजही शहरातील काही भागात ८ दिवसांनंतर तर आयोध्यानगरासारख्या भागात १५ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. येथील रहिवाशांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. याबाबत पालिकेला वारंवार माहिती दिली, परंतु, यावर कसलीच कारवाई करण्यात न आल्याने आजही येथील रहिवाशांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
अध्यक्ष, नगरसेवकांचे दुर्लक्ष
निवडणूक असली की दिवसात चार चार चकरा मारणारे नेते आता नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या भागात पाणीटंचाई असतानाही आणि कल्पना देऊनही नगराध्यक्ष अथवा नगरसेवकांनी ही समस्या मार्गी लावलेली नाही. टाकीचे काम पूर्ण होईपर्यंत टँकर अथवा इतर मार्गाने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते, परंतु तसे काहीच झाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोट
अयोध्यानगर भाग नुकताच पालिकेच्या हद्दीत आला आहे. या भागासाठी स्वतंत्र जलकुंभ तयार केला जात आहे. साधारण तीन ते चार महिन्यात कुंभाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर येथेही सुरळीत पाणीपुरवठा होईल.
राहुल टाळके, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प. बीड