बीड : जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामुळे बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.बीड शहराला पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बिंदुसरा धरण तर महिन्यापूर्वीच मृत साठ्यात गेले आहे तर माजलगाव धरणातील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणातील उद्भवापासून जवळपास अडीचशे मिटर पाणी आत गेले आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजना म्हणून सात मिटर खोल व अडीचशे मिटर दुर अशी चारी खोदली आहे. याद्वारे सध्या पाणी उपसा केला जात आहे. सध्या जरी उपाययोजना केल्या असल्या तरी आतापर्यंत पाऊस पाहता ही परिस्थिती यापुढे गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.हाच धागा पकडून बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री दिपक सावंत यांच्याकडे केली होती. याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. याला बैठकीत मंजुरीही मिळाल्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, अभियंता किरण देशमुख, राहुल टाळके यांनी धरणाची पाणीपातळी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांनी यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.दरम्यान, नाशिक विभागात मागीण काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढला आहे. बीड जिल्ह्यात मात्र, अद्यापही पाऊस अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही.हाच धागा पकडून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. याला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी धरणात आल्यावर बीड, माजलगाव शहरांसह ११ खेड्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील बिंदुसरा व माजलगाव धरणातील पाणी पातळी लक्षात घेता जायकवाडीतील पाणी पैठण उजवा कालव्यातून सोडण्याची मागणी केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरीही मिळाली आहे. हे पाणी माजलगावला आल्यावर बीडसह माजलगाव शहर व ११ खेडी आणि परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.- डॉ.भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष, नगर परिषद बीड