लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईने ग्रासले आहे. यासाठी दोन महिन्यांपासून रीतसर निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करुनही गावाला पाणी मिळत नसल्याने २६ रोजी नागरिकांनी संतप्त होऊन पंचायत समितीसमोर हांडे, घागर आणून ठिय्या आंदोलन केले.धर्मेवाडी हे गाव दुष्काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच पाण्यासाठी होरपळत असताना दोन महिन्यांपूर्वीच माजलगाव पंचायत समितीकडे टँकरसाठी प्रस्ताव करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी १ नोव्हेंबर रोजी तलाठी कार्यालयावर निदर्शने केली. १३ नोव्हेंबर रोजी तालखेड फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले. ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, त्यावर प्रशासनाने २५ डिसेंबरपर्यंत टँकर सुरू करण्याबाबत आंदोलकांना आश्वासन दिले मात्र ते देखील अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे संतप्त गावकºयांनी थेट मुले, महिला, नागरिकांनी घागर, हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठले.आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्याने पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला. टँकर चालू केल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. या वेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, उपसभापती डॉ. वसीम मनसबदार तसेच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच टॅँकरबाबतचा प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सांगितले.त्यावर आंदोकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. त्या ठिकाणी आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्याकडे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती प्रस्तावांची हेळसांड करून पाण्यासाठी नागरिकांची होरपळ करीत असल्याचा पाढाच वाचला.या आंदोलनात सुंदर चव्हाण, संतोष राठोड, महादेव सुरवसे, वैजनाथ हुंबे, विठोबा काळे, रेवणनाथ यादव, राजाभाऊ दरवेशी आदींसह गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
धर्मेवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:07 AM
तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईने ग्रासले आहे. यासाठी दोन महिन्यांपासून रीतसर निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करुनही गावाला पाणी मिळत नसल्याने २६ रोजी नागरिकांनी संतप्त होऊन पंचायत समितीसमोर हांडे, घागर आणून ठिय्या आंदोलन केले.
ठळक मुद्देपंचायत समितीचे दुर्लक्ष : तीन वेळा आंदोलन करुनही मिळेना पाणी; पंचायत समितीचे तहसील कार्यालयावर खापर