माजलगाव : पैठण येथील नाथसागर धरण भरत आल्याने या धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे चार दिवसांपूर्वी सोडण्यात आले होते. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता माजलगाव धरणात आल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.नांदूर, मधमेश्वर, मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे नाथसागर धरण हे केवळ चार दिवसात भरत आले तर दुसरीकडे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नाथसागरातून माजलगाव धरणात उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी झाली होती. चार दिवसांपूर्वी नाथ सागर धरण ८० टक्के भरल्याने ९ आॅगस्टपासून माजलगाव धरणात कालव्याद्वारे ९०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.ते मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव धरणात पोहोचले. यामुळे बीड व माजलगाव शहरासह अनेक गावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:18 AM