: १७ गावांत २३ विहिरी, इंधन विहिरींचे अधिग्रहण
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याला एप्रिलपासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात १७ गावांमध्ये २३ विहिरी व इंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर तालुक्यातील काळवटी तांडा येथे टँकरची मागणी करण्यात आली आहे.
यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. समाधानकारक झालेल्या पावसामुळे दिवाळीपर्यंत तालुक्यातील विहिरी, नदी, नाले, ओढे वाहत होते. मात्र, जानेवारीपासून परिस्थिती पुन्हा बदलली. नदी, ओढ्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागले. ज्या नद्या दुधडी भरून वाहत होत्या त्या नद्यांचे आज डोह झाले आहेत. तरी यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाहीत. मात्र, अशाही स्थितीत अंबाजोगाई तालुक्यातील १७ गावात २३ विहिरी व इंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथे टँकरची मागणी केली आहे. तर तालुक्यातील मूर्ती, पट्टीवडगाव, चोपनवाडी, साळुंकवाडी, बागझरी, भतानवाडी, नवाबवाडी, हातोला, शेपवाडी, नांदगाव, डोंगर पिंपळा, भावठाणा पवार वस्ती, राजेवाडी तांडा, निरपणा, लिंबगाव, सोनवळा, बाभळगाव या १७ गावांमध्ये २३ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
ज्या गावांमध्ये अधिग्रहणासाठी व टँकरसाठी प्रस्ताव दाखल होतील, अशा गावांची पाहणी तहसील कार्यालयामार्फत होईल. व त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी तत्काळ अधिग्रहण अथवा आवश्यकतेनुसार टँकरच्या फेऱ्या सुरू करण्यात येतील.
-संदीप घोणसीकर, गटविकास अधिाकरी,
अंबाजोगाई.