शिरूर कासार : प्रदीर्घ काळानंतर सिंदफणा नदी खळखळते आहे. मात्र, या नदीच्या जल वैभवाला घाणीची किनार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सिंदफणा नदीकाठ म्हणजे हक्काची कचराकुंडी मानली जात असल्याने तेथे घाणीचा विळखा पडला आहे.
नदीकाठावर बाजार ओटे, सोमवारी भरणारा बाजार, रोजची गुजरी याशिवाय असलेले हाॅटेल, दुकानातून निघालेला कचरा इथेच टाकला जातो. नगर पंचायतीच्या घंटागाड्या फिरत असताना कचरा त्यात टाकण्याऐवजी ‘झाडला की लोटला नदीत’ अशीच मानसिकता बनत चालल्याने सिंदफणा नदीच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. याशिवाय नदीपात्रात सुबाभळीदेखील वाढल्या आहेत. वेळप्रसंगी नैसर्गिक विधीसाठी देखील वापर केला जात आहे.
‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ या संकल्पनेतून शहरातून नित्याने स्वच्छता केली जात असली तरी शहरालगतची नदी मात्र घाणीने व्यापली आहे. बाजाराच्या दिवशी विक्रेते त्यांचा भाजीपाला सुकू नये म्हणून नदीतील पाणी त्यावर मारतात. मग हे पाणी स्वच्छच असले पाहिजे, त्यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे जरूरी आहे. मात्र, वेळोवेळी नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर प्रभारी नेमणूकदेखील काही अंशी याला कारणीभूत ठरत आहे.