लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील काही भागांत दोन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. सांडपाणी म्हणून वापरात आणण्या एवढेही पाणी शुद्ध नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून बीडकर विकतच्या पाण्यावर तहान भागवित असून तात्काळ उपाययोजना करण्यात बीड पालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे.
बीड शहराला माजलगाव व बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. वीज बिल थकल्यामुळे महावितरणने दोन्ही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला. चार दिवसानंतर वीज भरले आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला. पाणी जरी आले असले तरी ज्या ठिकाणाहून पाणी ओढले जाते, त्याठिकाणी घाण झाली होती. तसेच जलवाहिनीही दूषित झाली होती. याचा जलवाहिनीतून पुन्हा पाणीपुरवठा झाल्याने शहरातील पिंपरगव्हाण रोड, भक्ती कन्स्ट्रक्शन, अंबिका चौक भाग अशा अनेक ठिकाणी दूषित पाणी आले. पाण्याची दुर्गंधी सुटली होती. हे पाणी सांडपाणी म्हणूनही वापरण्यास योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकावयास मिळाल्या.
दरम्यान, पालिकेने सध्या जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाऊले उचलल्याचे सांगण्यात आले. तरीही आणखी किमान दोन दिवस सर्व जलवाहिनी स्वच्छ होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात ज्या भागात पाणी आले आहे, त्यांच्यामधून पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा अभियंता निखिल नवले म्हणाले, पाणीपुरवठा बंद असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. नागरिकांनी घाबरू नये. पालिका प्रयत्न करीत आहे.आरोग्यास धोकादूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्वचा व इतर आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.