माजलगाव : चिंचगव्हाण येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून माजलगाव शहर व ११ पुनर्वसित गावांना मागील अडीच वर्षांपासून फिल्टर न केलेले पाणी पिण्याची वेळ आली. सहा महिन्यांपूर्वी या फिल्टर दुरुस्तीचे टेंडर काढूनही केवळ वर्कऑर्डर न दिल्याने या गावातील ग्रामस्थांवर मागील अडीच वर्षांपासून अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.
माजलगाव धरणातून माजलगाव शहर व ११ पुनर्वसित गावातील ग्रामस्थांना दररोज पाणी मिळावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १९८५ साली तत्कालीन आ. बाजीराव जगताप यांच्या कार्यकाळात जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून योजना केली होती. धरणाच्या बाजूला विहीर घेऊन त्यातील पाणी बाजूलाच असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करूनच या सर्व गावांना पाणी देण्याची ही योजना होती. या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मागील अडी ते तीन वर्षांपासून केवळ दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे धूळ खात पडून आहे. धरणातून आलेले पाणी फिल्टर होत नसल्यामुळे ते थेट नळाद्वारे ग्रामस्थांना मिळत आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना मागील अडीच ते तीन वर्षांपासून अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. या फिल्टर दुरुस्तीसाठी ६ ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांनी टेंडर काढले होते. यात पाच जणांनी टेंडर भरलेदेखील होते.
हे टेंडर ओपन केले. कमी रकमेच्या टेंडरधारकास टेंडर दिले. परंतु त्यांनी बिलाची रक्कमच भरली नसल्यामुळे हे टेंडर त्याला दिले नसल्याचे नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. पहिल्या टेंडर धारकाच्या चुकीमुळे त्याला नगरपालिकेने नोटीस देऊन दुसऱ्या टेंडरधारकास काम देणे आवश्यक असताना तो टेंडरधारक आपल्या जवळचा नाही किंवा त्याच्याकडून चिरीमिरी मिळण्याचा अंदाज नसल्यामुळे त्यास नगरपालिकेने टेंडर दिले नसल्याचे कर्मचारीवर्गातून बोलले जात आहे. पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांचा फायदा होत नसल्याने त्यांनी फिल्टर दुरुस्तीची वर्क ऑर्डर न करता केवळ लिकेज काढणाराकडून हे फिल्टर फक्त घेऊन ग्रामस्थांना अशुद्ध पाणी पाजण्याचे काम त्यांनी केले आहे.
नगरपालिकेकडे फिल्टर दुरूस्तीसाठी पैसे उपलब्ध असताना आपला फायदा होणार नाही. या कारणामुळे टेंडर काढूनही वर्कऑर्डर दिली नसल्याचे बोलले जाते. मात्र, याबाबत ना सत्ताधारी नगरसेवक बोलत, ना विरोधी नगरसेवक. केवळ पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या फायदयासाठी ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचे यावरून दिसत आहे.
फिल्टर दुरूस्ती म्हणजे काय ?
फिल्टर दुरुस्तीचे टेंडर जवळपास ३५ लाखाला निघाले आहे. या टेंडरधारकानी या ठिकाणची वाळू बदलणे, वॉल चेंज करणे, फ्लोरिंग बदलणे (फरशी बदलणे) पंपाची सर्व्हिंसिंग व रिपेरिंग करणे आदी बाबींची दुरूस्ती करायची आहे.
सहा महिन्यांपूर्वी कमी रकमेचे टेंडर भरणारास टेंडर दिले होते. परंतु त्याने अनेक दिवस कामालाच सुरूवात केली नाही. तो न्यायालयात जाईल. त्यामुळे दुसऱ्या नंबरच्या व्यक्तिला टेंडर देता आले नाही. लवकरच याचे पुन्हा टेंडर पुकारण्यात येईल. तोपर्यंत फिल्टरची स्वच्छता करण्यात आली आहे.
- शेख मंजूर, नगराध्यक्ष, न. प. माजलगाव