माजलगाव : नळाला पाणी सोडण्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नगर परिषद पाणी पुरवठा कर्मचारी सचिन शिंदे यांना एका नगरसेवक पुत्राने मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्याने काही भागात बारा दिवसापासून पाणी न मिळाल्याने निर्जळी झाली आहे. दरम्यान नगर परिषदेत जबाबदार पदाधिकारी, अधिकारी नसल्याने उशिरापर्यंत या प्रकरणी कसलाही तोडगा निघाला नव्हता.
माजलगाव शहरात नगर परिषदेकडून किमान आठ दिवसांत एकदा पाणीपुरवठा नळ योजनेतून केला जातो. मागील काही दिवसांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात उशीरा पाणी पुरवठा होत आहे. त्यात सोमवारी पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्रात विजेचा बिघाड झाला होता, त्याची दुरुस्ती करून मग जलकुंभ भरण्यात आले व त्यानंतर काही भागात पाणी पुरवठा सुरू झाला. यातच दुपारी ४ वाजेच्या दरम्यान पाणी सोडणारे कर्मचारी सचिन शिंदे यांना मोंढ्यात एका नगरसेवक पुत्राने गाठून आमचेकडे पाणी का सोडत नाही म्हणून जाब विचारला. तसेच शिवीगाळकरून शिंदे यांना मारहाण करण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे फुलचंद कटारे यांनी समजूत काढली व प्रकरण मिटवले.
या घटनेनंतर शिंदे व इतर कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकत पाणी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे अगोदरच निर्जळी असताना पाणी-पाणी अशी वाट पहात असलेल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दरम्यान या नगर परिषदेचा कारभार वाऱ्यावर असून मुख्याधिकारी, कार्यालय अधीक्षक, पाणीपुरवठा विभाग प्रमुख,सर्व बाहेरगावी असल्याने तोडगा काढण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. याप्रकरणी कुठलीही तक्रार उशिरापर्यंत देण्यात आली नव्हती.