माजलगाव : नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्यांनी दहा महिन्यांचा थकीत पगार द्यावा, या मागणीसाठी शुक्रवार दि. २५ रोजी माजलगाव शहर व ११ गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवर काम बंद पुकारत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे माजलगाव शहर व ११ गावचा पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद झाला आहे.
माजलगाव व ११ गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवरील सर्व कर्मचार्यांचे ऑक्टोबर २०१९ पासून पगार थकीत आहेत. परिणामी पाणी पुरवठा कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार निवेदने देवूनही थकीत पगारासाठी मुख्याधिकार्यांकडून वेळकाढू धोरण स्विकारले जात आहे. तसेच एप्रिल २०२० रोजी थकीत पगाराच्या मागणीसाठी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी आठवडाभरात थकीत पगार देण्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले होते.
या घटनेला चार महिने उलटून गेल्यानंतरही कर्मचार्यांना पगार देण्यात आलेला नाही. कर्मचार्यांना वर्षभरापासून पगार नसल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे.