केज ( बीड) : जबाबदारी नसतानाही विद्युत तांत्रिक कर्मचाऱ्यांवर थकीत वीज बिलाची वसुली न झाल्याच्या ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली जात आहे, या कारवाईच्या विरोधात वीज कामगार संयुक्त कृती समितीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अंबाजोगाई येथील विभागीय कार्यालयासमोर विद्युत कर्मचारी जमले असून त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात वीजबिल थकबाकी वाढली आहे. वसुलीसाठी महावितरणचे औरंगाबाद विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी दिनांक १ सप्टेंबर २०२१ मध्ये १४६४ क्रमांकाचे परिपत्रक काढळे आहे. यानुसार वीज बिलाची २५ हजार रुपयापर्यंतची वसुली शाखा अभियंता, २५ हजार एक रुपया ते ५० हजार रुपयापर्यंत उपकार्यकारी अभियंता, ५० हजार १ रुपया ते एक लाख रुपया पर्यंतची कार्यकारी अभियंता, १ लाख १ रुपये ते पाच लाख रुपया पर्यंत अधीक्षक अभियंता तर ५ लाख रुपया पेक्षा जास्तीची थकबाकी मुख्य अभियंत्यांनी करण्याची जबबादारी देण्यात आलेली आहे. मात्र, शाखा अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी वसुली केली नसल्याने ऑगस्ट २०२१ पासून अंबाजोगाई विभागाची थकबाकी कोटयावधी रुपयांच्या घरात गेली आहे.
परंतु, विद्युत बिलाची वसुली न केल्याचा ठपका विद्युत कर्मचाऱ्यांवर ठेवत दंडात्मक कारवाई करत सातत्याने कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहेत. वसुलीची जबाबदारी नसतानाही कामगारांत दहशत पसरवून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. याविरोधात कामगार महासंघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, वीज तांत्रिक कामगार युनियन, वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, स्वाभिमानी वर्कर्स युनियन, क्रांतिकारी लाईनस्टाफ़ सेना, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटना अशा अंबाजोगाई विभागातील ९ विद्युत कर्मचारी संघटनांनी एकत्र येत वीज कामगार संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे. आज सकाळपासून सर्व कर्मचारी अंबाजोगाई येथील विभागीय कार्यालयासमोर जमले असून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
अशा आहेत मागण्या :- कर्मचाऱ्यांवरील दंडात्मक कार्यवाही रद्द करण्यात यावी,- वीज बिलाच्या वसुलीसाठी १४६४ परिपत्रकाची अमलबजावणी करण्यात यावी, - चुकीची मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर कार्यवाही करावी - वसुलीत दिरंगाई करणाऱ्या विभागातील उपकार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांना निलंबित करावे