आष्टी : दुसरी लाट रोखण्यास बीड जिल्ह्याला यश आले असून कितीही मोठी आपत्ती आली तरी आरोग्य सुविधा देण्यास कमी पडणार नाही. बीड जिल्हा सक्षम असेल. रुग्णांच्या सेवेसाठी प्रसंगी आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवू असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
येथील ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात ५० बेडच्या आधार कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार रोहित पवार,आमदार संदीप क्षिरसागर, आ.बाळासाहेब आजबे आ. यशवंत माने, माजी आ. साहेबराव दरेकर,माजी आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,रामकृष्ण बागर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, जि. प. सदस्य सतीश शिंदे, भाऊसाहेब लटपटे आदी उपस्थित होते.
यावेळी मुंडे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासली. सर्वात पहिल्यांदा आष्टी येथे ऑक्सिजन प्लांटला मंजूरी दिली. यापुढे जिल्हाभरात लागणा-या ऑक्सिजनची निर्मिती जिल्ह्यात केली जाणार असून यापुढील १ महिन्यात बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची गरज भासणार नाही. कोरोना बाधित रुग्णांचे हाल होऊ नये त्यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी मागिल लाटेमध्ये ३००० ऑक्सिजन बेड उपलब्ध केले होते. दुसऱ्या लाटेत व येणाऱ्या तिसऱ्या लाटेत कोणीही बळी होऊ नये यासाठी खबरदारी घेत आहोत. कोविड काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी,पोलिस प्रशासन,नागरीकांचे त्यांनी धन्यवाद मानले. आ. रोहित पवार यांनी सहकार्याचे आश्वासन दिले.यावेळी किशोर हंबर्डे, शिरीष थोरवे,परमेश्वर शेळके,मनोज चौधरी, अण्णासाहेब चौधरी, दिगांबर पोकळे, बाबासाहेब वाघुले, सरपंच अशोक पोकळे,नाजिम शेख,आदी उपस्थित होते.