घाटनांदूर : मागील एक-दोन आठवड्यांत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र नुकसान झाले असून, नगदी पीक असलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवडनिवड न करता सरसकट नुकसानभरपाई कशी देता येईल यासाठी प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन पाठीशी असल्याची ग्वाही विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड यांनी दिली.
रविवारी संपूर्ण दिवसभर आ. संजय दौंड यांनी कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पट्टीवडगाव जिल्हा परिषद गणामधील सर्व गावे, तसेच घाटनांदूरसह परिसरातील घोलपवाडी, चोथेवाडी, मुरंबी, लिंबगाव या भागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवीत प्रत्यक्ष पाहणी केली. आ. दौंड यांच्याकडे व्यथा मांडत अनेक शेतकरी हमसून रडत होते. याप्रसंगी कृउबा संचालक ॲड. इंद्रजित निळे, बाबूराव जाधव, मंडळ कृषी अधिकारी जी. डी. ठाकूर, कृषी सहायक एन. बी. गायकवाड, तलाठी एस. एल. कराड, तलाठी मगर, महसूल मंडळ अधिकारी अंबाड व शेतकरी उपस्थित होते.
काय दिसले
डोंगरी भागापेक्षा घाटमाथ्यावरील जमिनीतील पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कित्येक दिवस पाण्याखाली पिके राहिल्याने सडली आहेत. सततच्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगा सडल्या आहेत. चोथेवाडी भागात रेणा नदीच्या शेजारील उभ्या पिकात शेतात जमा झालेल्या पाण्याचा अद्याप निचरा झालेला नसल्याचे या पाहणीत दिसून आले.
एकही शेतकरी वंचित राहणार नाही
ऑनलाइन नोंद होईल अथवा नाही सरसकट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, तशा सूचना प्रशासनाला दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. नुकसानभरपाई सरसकट मिळवून देणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
130921\img-20210912-wa0021.jpg
आ संजय दौंड शेतकऱ्यांच्या बांधावर .