बीड : आषाढी एकादशीनंतर शेगांवकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पाली येथे सोमवारी मुक्कामानंतर पालखी सोहळा शहरातील बार्शी नाका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर भाविकांनी स्वागत केले. बशीरगंज, राजुरी वेस, कारंजा, बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, नवा पूल मार्गे पालखी बालाजी मंदिरात पोहचली. तेथे व्यापारी बांधवांच्या वतीने स्वागत, पूजा, आरतीनंतर वारकरी बांधवांसह भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. काही वेळ विसाव्यानंतर पालखी सोहळा पेठ बीड संस्थानच्या विठ्ठल मंदिरात पोहचला. तेथे परंपरेनुसार एकनाथ महाराज पुजारी यांनी महानैवेद्यासह पूजन, आरती केली. यावेळी महिला- पुरुष भाविक उपस्थित होते. त्यानंतर पालखी सोहळा खडकपुरा मार्गे श्री कनकालेश्वर मंदिरात पोहोचली. तेथे सायंकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पालखीतील वारकरी तसेच शहरातील भाविकांनी दर्शनासह इतर व्यवस्था सांभाळली. पालखीचे बुधवारी सकाळी रामनगरमार्गे पेंडगावकडे प्रस्थान होईल.पायदळवारीतील ५३६ वारकऱ्यांची आरोग्य तपासणीवारकऱ्यांची केलेली सेवा, शुश्रूषा पांडुरंग चरणी अर्पण होते या श्रध्देने रोटरी क्लब, निमा व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने संत गजानन महाराजांच्या पायदळवारीतील ५३६ वारकºयांची मोफत आरोग्य तपासणी केली. दहा वर्षांपासून हा उपक्र म राबविला जातो.निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.अजित जाधव, डॉ.मनोज पोहनेरकर, डॉ. संदीप बेद्रे यांनी तपासणी केली.यावेळी वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत घुगरे, रोटरी क्लबचे बबनराव शिंदे, सचिव गणेश मुळे, राम मोटवाणी, संतोष जोशी, संतोष पवार, प्रमोद निनाळ, निमा, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना व रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे बीडमध्ये जोरदार स्वागत; ठिकठिकाणी दर्शनास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:03 AM