लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची चिंता आगोदरच आहे. त्यात आता बाधितांवर उपचार करण्यासाठी प्रभावी समजल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा दुसरी मोठी समस्या बनली आहे. शासनाने इंजेक्शनचे दर निश्चित केले असले तरी बीडमध्ये एकही इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे नातेवाइकांची धावपळ होत आहे. किमतीचं काय घेऊन बसलात, आम्ही पैसे मोजायला तयार आहोत, फक्त इंजेक्शन द्या, अशा भावना नातेवाईक व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळतच नाही. रोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत लोक जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय व घरासमोर दिवसरात्र जागरण करीत आहेत. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त अर्ज आले आहेत, परंतु एकालाही इंजेक्शन नाही. तुटवडा असल्याचे आरोग्य विभाग सांगतो.
औषध निरीक्षक, सीएसला हजारो कॉल्स
रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व औषध निरीक्षकाला रोज हजारो कॉल येत आहेत; परंतु इंजेक्शनच नसल्याने त्यांच्याकडून कॉलल प्रतिसाद दिला जात नसल्याचे सांगण्यात आले.
लाईफलाईनमधील चौकशी प्रलंबित
काही दिवसांपूर्वीच बीड शहरातील लाईफलाईन हॉस्पिटल संलग्न असलेल्या मेडिकलमधून चढ्या दराने इंजेक्शन विकल्याची तक्रार शहर पोलिसांत केली होती. त्याची चौकशी अद्याप प्रलंबितच आहे.
खासगी डॉक्टरांनी झटकले हात
खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना हे इंजेक्शनच मिळत नाही. खासगी डॉक्टर एका चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी नातेवाइकांच्या हाती टेकवितात. वास्तविक पाहता सर्व औषधीसाठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्याच रुग्णालयांची असते; परंतु ते हात झटकत असल्याचे दिसते.
व्हेंटिलेटरवरील रुग्ण वाढले
कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यासह गंभीर रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी ऑक्सिजनवर १२०० पेक्षा जास्त रुग्ण होते, तर १५ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. मंगळवारी हा आकडा २० कडे गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.