परळी (बीड ) : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. यानंतर विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले की, भाजप सेनेचे सरकार अकार्यक्षम सरकार आहे. परळी मतदार संघातील शेतकऱ्याना पीक विमा मिळत नाही तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. या धरणे आंदोलन स्थळावरून उठणार नाही. परळी, आंबाजोगाई तालुक्यातील माय बाप जनतेच्या जीवावर मंत्री झाल्या त्यांनी पीक विमा मिळण्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारून धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री मंत्री पंकजा मुंडे यांच्या वर टीका केली. वैद्यनाथ कारखान्यात अजब कारभार सुरू आहे, कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले जात नाहीत, एफ आर पी प्रमाणे पैसे द्या, कारखानाच्या संचालक मंडळावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.थर्मल ही बंद झाले आहे, मंत्री पंकजा मुंडे या अकार्यक्षम असल्याने येथे एक ही प्रकल्प आला नाही असा आरोपही त्यांनी केला.
अशा आहेत मागण्या
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह सर्व पिकांचा पीक विमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या ऊसाची बीले मिळावीत, दुष्काळामुळे दुबार पेरणीसाठी मदत करावी, मागील काळातील थकीत अनुदाने द्यावेत, सरसकट कर्जमाफी करावी, परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, परळी तालुक्यातील प्रकल्पांचा वॉटर ग्रीड योजनेत समावेश करावा, परळी औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू करावे आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.