अंबाजोगाई : तालुक्यातील गडदेवाडी येथे मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. गळा आवळून व डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे समोर आले होते. दरम्यान, या गुन्ह्याची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. दोन मित्रांनी त्यांना दारूच्या घोटासाठी संपविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एका आरोपीने अटकेच्या भीतीने आत्महत्या केली; तर दुसऱ्याची रवानगी तुरुंगात झाली आहे.
बाबूराव विठ्ठल गडदे (वय ४५, रा. चिचखंडी, ता. अंबाजोगाई) यांची १० मार्च रोजी गडदेवाडी शिवारात हत्या झाली होती. त्यांचा खून गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले. तपासाअंती आरोपी रामचंद्र गडदे आणि महादेव गडदे या दोघांनी हा खून केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले. पोलिसांनी तीन पथके तैनात करून त्या दोघांचा शोध सुरू केला. त्यातील एक पथक गडदेवाडीच ठाण मांडून होते. दरम्यान, १२ रोजी महादेव गडदे याने अटकेच्या धास्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरा आरोपी रामचंद्र गडदे यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस कोठडी संपल्यावर १९ रोजी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. अप्पर अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे व सहकाऱ्यांनी तपास केला.
उलगडला थरारपटआरोपीे रामचंद्र गडदे याला पोलिसी खाक्या दाखवताच हत्येचा थरारपट उलगडला. बाबूराव गडदे, महादेव गडदे आणि रामचंद्र गडदे हे तिघे मित्र ९ मार्च रोजी दारू पिण्यास बसले. यावेळी सुरुवातीला त्यांनी महादेव गडदे याच्याजवळील दारू पिली. त्यानंतर महादेव आणि रामचंद्र हे बाबूरावला त्याच्याजवळील दारू पिण्यासाठी बाहेर काढ म्हणून मागे लागले, परंतु त्यासाठी बाबूराव टाळाटाळ करत होता. त्यामुळे चिडून त्या दोघांनी बाबूरावच्याच गमज्याने त्याचा गळा आवळला. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतला.