Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानापूर्वी शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी सोनवणे यांना निवडून आणण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. तसंच यावेळी पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भाष्य केलं.
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, "मला आनंद आहे की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलेला, शेतकऱ्यांबद्दल आस्था असलेला, शेती अर्थव्यवस्थेला कारखानदारीशी जोड देण्याची किती जरूर आहे, याची जाण ज्याला समजली, अशा व्यक्तीला आणि या दुष्काळी भागामध्ये, जिरायत भागामध्ये आज कारखानदारी उभी करून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो, त्या बजरंग सोनवणे यांना मोठ्या मतांनी या ठिकाणी आज आपण विजयी केलं पाहिजे. मी बीड जिल्ह्याच्या दृष्टीने एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची आहे, हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे, हा जिल्हा पुरोगामी विचारांना पाठिंबा देणारा जिल्हा आहे, हा जिल्हा समाजातील सगळ्या घटकांना एकत्र ठेवणारा जिल्हा आहे, आणि त्यामुळे आपल्याला समाजातील सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना एक ठेवलं पाहिजे. काही लोकांचा प्रयत्न की जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये अंतर वाढावं, कटूता वाढावी. पण मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मला या जिल्ह्यातील सामान्य माणसाचं जे अंतःकरण माहिती आहे, ते अंत:करण बघितल्यानंतर तो हिंदू असो, मुस्लिम असो, शेड्युल्ड कास्ट असो, आदिवासी असो, आज या सगळ्या समाजाचे लोक एकत्र राहून पुढे जाणे आणि जो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे, तो विचार घेऊन आज कोणी जरांगे पुढे येत असतील, आणखी कोणी पुढे येत असतील, त्या ऐक्याच्या विचाराला ज्यांनी हातभार लावला, त्या सगळ्यांना आपण लोकांनी सहकार्य केलं पाहिजे," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?
शरद पवार यांनी आजच्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या भेटीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "जरांगे पाटील यांचं धोरण काय, हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो, जरांगे पाटील यांना भेटलो, त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय? आणि त्यांना एकच विनंती केली, की तुम्ही या राज्यात जो-जो कष्ट करतो जो-जो मेहनत करतो आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करतो, तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही विचारांचा त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू आणि एक नवीन विचार घेऊन सबंध देशाला या रस्त्यावर आणू," असंही पवार यांनी म्हटलं आहे.
मोदींना हटवण्याचं पवार यांचं आवाहन
शरद पवार यांनी बीडमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हा देश एकसंघ ठेवायचा असेल, तर हिंदू असो, मुस्लिम असो, दलित असो, शीख असो, ईसाई असो या सगळ्यांना एकत्र ठेवावे लागेल. या सगळ्यांचा आत्मविश्वास हा वाढवायला पाहिजे. पण दुर्दैवाने हा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणाने मुस्लिम समाजाच्या विरुद्ध बोलतो. जो समाज या देशात कष्ट करणारा सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम तत्पर आहे, त्या समाजाला बेइज्जत करण्याचं काम आज या देशाच्या प्रधानमंत्री यांनी केलं. त्याचं कारण एकच आहे की त्यांची विचारधारा एक वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुस्लिम आणि गरीब लोकांबद्दलचा द्वेष हा कायम आहे. तो द्वेष आज या ठिकाणी बघायला मिळतो, आणि म्हणून जो प्रधानमंत्री पदावर बसलेला आहे, त्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागेल, हे मोदींकडून होत नाही. त्यामुळे मोदींना मदत होईल, अशा प्रकारचं कुठलंही काम तुम्ही आणि मी करायचं नाही हा निर्णय घेतला पाहिजे. तो निर्णय घ्यायचा असेल, तर बजरंग सोनवणे यांना मोठ्या मतांनी तुम्ही या ठिकाणी विजयी करा, आणि एक नवीन इतिहास तयार करायला हातभार लावा," असं आवाहन पवार यांनी केलं आहे.