एक माणूस वाळवंटातून चालत प्रवास करत असतो. दूर दूरवर त्याला वाळूशिवाय काहीच दिसत नाही. जवळचे पाणीदेखील संपलेले असते. त्याला कंठशोष पडलेला असतो. पाणी मिळण्याची थोडीही आशा दिसत नाही. तरी तो चालत असतो.
चालता चालता नजरेच्या टप्प्यावर त्याला एक झोपडी दिसते. त्याची आशा पल्लवित होते. पण, हा मृगजळासारखा भास तर नाही ना? या विचाराने तो झोपडीच्या दिशेने चालू लागतो. जस जसा जवळ जातो, तिथे झोपडी अस्तित्त्वात असल्याचे त्याच्या लक्षात येते.
तो देवाचे आभार मानतो. त्याच्या पावलांना गती येते. तो भरभर चालू लागतो. तिथे पाणी नक्कीच मिळणार याची त्याला खात्री वाटते. झोपडीजवळ पोहोचल्यावर आत डोकावून पाहतो, तर आत कोणीच नसते. रिकामी झोपडी पण आतमध्ये एक पाण्याचा पंप असतो. बाकी काही नसले, तरी महत्त्वाची गोष्ट आहे, याचा त्याला आनंद होतो.
तो पंप चालवून पाहतो, पण पाणीच येत नाही. तो निराश होतो. जमिनीवर उताणा पडतो. तर छताकडे त्याचे लक्ष जाते. छताला पाण्याची बाटली लटकवलेली असते. तो लगेच उठतो आणि ते बाटलीतले पाणी तोंडाला लावणार तोच बाटलीच्या खाली चिकटवलेली चिठ्ठी त्याला दिसते. तो ती उघडून वाचतो. त्यात लिहिलेले असते, ज्याला पाणी हवे असेल, त्याने या बाटलीतले पाणी पंपात ओतावे, पंपातून पाणी सुरू होईल व पाणी पिऊन झाल्यावर बाटली भरून या चिठ्ठीसह छताला बाटली टांगून ठेवावी.
तो विचार करतो, पंपात पाणी ओतले, पण पाणीच आले नाही तर, हातात आहे तेही पाणी मिळणार नाही. शेवटी तो देवाचे नाव घेऊन पाणी पंपात ओततो आणि हँड पंप जोरजोरात वर खाली करतो. काय आश्चर्य, नळातून गारेगार पाणी येऊ लागते. ते पाण पिऊन त्याची तहान भागते. तो चिठ्ठीत दिल्याप्रमाणे एक बाटली पाणी भरून छताला बाटली अडकवून झोपडीतून बाहेर निघत असतो. तिथे दारावर त्याला आणखी एक चिठ्ठी दिसते, त्यात वाळवंटातून बाहेर पडण्याचा नकाशा दिलेला असतो. तो मनुष्य पुन्हा देवाचे आणि ही मदत करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानतो. वाट चुवूâ नये, म्हणून तो नकाशा आपल्या खिशातून नेऊ पाहतो. परंतु त्याक्षणी त्याला जाणीव होते, जशी आपल्यासाठी अज्ञात व्यक्तीने ही मदत केली, तशी आपल्यामुळेही अज्ञात व्यक्तीला मदत होणार असेल, तर आपण हा नकाशा इथेच सांभाळून ठेवला पाहिजे.
गोष्टीचे तात्पर्य हेच, की आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयींमागे अज्ञात हातांनी केलेली मेहनत कारणीभूत असते. आपल्यालाही कोणासाठी अज्ञात व्यक्ती बनून कोणाच्या मदतीचे कारण होता आले पाहिजे. शेवटी काय, तर एकट्याने काहीच साध्य होणार नाही, म्हणून `एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'