काय तुझ्या मनात? सांग माझ्या कानात, खुल्लमखुल्ला रे....!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:49 AM2018-06-24T00:49:12+5:302018-06-24T00:50:18+5:30
काय तुझ्या मनात.. सांग माझ्या कानात.. खुल्लमखुल्ला रे..’ हे मराठी चित्रपटातील गाणे मध्यंतरीच्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले होते. एकमेकाचा रुसवा, फुगवा काढण्यासाठी, चिडविण्यासाठी या गाण्याचा पुरेपूर वापर करून घेतला.
सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क
काय तुझ्या मनात.. सांग माझ्या कानात.. खुल्लमखुल्ला रे..’ हे मराठी चित्रपटातील गाणे मध्यंतरीच्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले होते. एकमेकाचा रुसवा, फुगवा काढण्यासाठी, चिडविण्यासाठी या गाण्याचा पुरेपूर वापर करून घेतला. बीडचे स्थानिक आमदार जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना या गाण्यातील पंक्तीप्रमाणे विचारण्याची वेळ बारामतीप्रमाणेच बीडकरांवरही आली आहे. ‘जिल्ह्यात रुसायचे आणि जिल्ह्याबाहेर हसायचे’ असे क्षीरसागर बंधूंचे राजकीय वागणे इतरांना कोड्यात टाकणारे असले तरी पक्षात अलिप्त राहूनही त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि विरोधकांना आपली राजकीय ताकद पुन्हा पुन्हा दाखवून दिली आहे, हे ही तितकेच खरे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस ७४ मतांनी विजयी झाले. अशक्यप्राय असलेली विजयश्री भाजपाने सहजरीत्या मिळविली असली तरी विजयाचा गुलाल मात्र बीडच्या नगर पालिकेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरेश धसांवर मनसोक्त उधळला होता. विजयाच्या या गुलालात सुरेश धसांपेक्षा क्षीरसागरच अधिक रंगले होते. पक्षाचा उमेदवार पडला म्हणून राष्टÑवादी काँग्रेस पक्षात सुतकी वातावरण असताना हे गुलालाचे रंग उधळविणे म्हणजे जिल्हातील विरोधकांना क्षीरसागर बंधूंचा एक प्रकारचा इशाराच होता. धसांनी आपल्या अशक्यप्राय विजयाचे गुपित म्हणजे ‘घड्याळ बांधणाऱ्या हाता’नी केलेली मदत, असे कोड्यात दिलेले उत्तर काही तासांतच उलगडले.
विजयानंतर गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन धसांनी थेट क्षीरसागर गडावर म्हणजे बीड पालिकेत प्रवेश करून बीडच्या राजकारणातील मुत्सद्दी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांची प्रेमाने गळाभेट घेतली. ही गळाभेट जिल्ह्याच्या भावी राजकारणात भल्याभल्यांना धडकी भरावी, अशीच होती. दीड वर्षांपासून क्षीरसागर बंधुंची भूमिका ‘तळ्यात मळ्यात’ अशीच पहावयास मिळाली. दिल्लीत झालेल्या तेली समाज एकता संमेलनासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह व्यासपीठावर होते. तत्पूर्वी या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. समाजाचा कार्यक्रम होता, असे गृहीत धरूया. परंतु, एकीकडे जिल्ह्यातील राष्टÑवादीच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवत रुसवेपणा दाखवायचा आणि जिल्ह्याबाहेर पक्षश्रेष्ठींच्या मांडीला मांडी लावून बसण्यामुळे पक्षात चलबिचल वाढली आहे. स्थानिक स्वराज्यचा निकालानंतर शरद पवार, अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. अजित पवार आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यातील हास्यविनोदाने विरोधकांच्या पोटात मात्र निश्चितच गोळा उठला असेल.