केज तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या गहू, ज्वारी व हरभरा पिकांसह आंब्याच्या झाडाचा मोहोर पावसाने झडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.
यावर्षी तालुक्यात पावसाळ्याच्या हंगामात समाधानकारक पाऊस होऊन सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. मुबलक पाणीसाठा झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. रब्बीच्या हंगामातील पिके जोमात येऊन काढणीच्या अवस्थेत असताना अचानक गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास
सुरू झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. पावसाचे आगमन जोराचा वारा, विजांचा कडकडाट व गारांच्या माऱ्याने झाल्याने शेतात काढलेला हरभरा, काढणीला आलेले गहू, ज्वारी व आंबा याचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्यावेळी अचानक वादळ वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
===Photopath===
190221\deepak naikwade_img-20210219-wa0019_14.jpg