परळी (बीड) - "मी कितीही मोठा झालो तरी सर्वात आधी मी एक कार्यकर्ता आहे, माझ्यातला कार्यकर्ता हा गुण मी कधीच संपू देणार नाही आणि ज्या दिवशी माझ्यातला कार्यकर्ता संपेल त्या दिवशी मी राजकारणात कोणत्याही निवडणूकीत यशस्वी होणार नाही," असं अनेक व्यासपीठांवरून धनंजय मुंडे हे नेहमी सांगतात. मात्र, ते बोलतात त्याचप्रमाणे वागतातही याचा प्रत्यय आज परळी बाजार समितीच्या निवडणुकीत आला.
साधारणपणे नेते मंडळी मतदानाच्या दिवशी आपल्या वेळेनुसार मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. मात्र, परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान आज सकाळी 8 वा. सुरू झाले आणि 8 वाजून 13 मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे मतदान बुथवर दाखल झाले. अचानकपणे आपले साहेब स्वतः इतक्या लवकर बुथवर आलेले पाहून कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्याचा धक्का बसला. बुथवर येताच मुंडे यांनी कार्यकर्त्यांप्रमाणे बूथ बाहेरील केंद्रावर ठाण मांडले. लागलीच कार्यकर्ते व मतदारांशी संवादही साधला. मतदान प्रतिनिधीना नाव व नंबर शोधून देण्याचे कामही मुंडे स्वतः करताना दिसून आले. अनेक मतदारांना फोनवर संपर्कही साधत होते. धनंजय मुंडे यांच्या या कृतीने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. केवळ कार्यकर्ते, मतदार नव्हे तर मुंडे यांनी विरोधी भाजपा पॅनलच्या कार्यकर्त्यांसोबतही यावेळी राजकीय वैर न ठेवता मोकळेपणाने संवाद साधला.
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू असुन आज धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या पॅनल मध्ये अटीतटीची निवडणूक होत आहे, आज मतदान होत आहे. मागील अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. कार्यकर्ते व मतदारांशी असलेल्या थेट संपर्कामुळे बाजार समितीसह मतदारसंघातील जवळपास सर्वच संस्थांवर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात सत्ता राहिलेली आहे.
धनंजय मुंडे हे नेहमीच प्रत्येक निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन निवडणूक लढवत असतात. दांडगा जनसंपर्क, स्वतः पूर्णवेळ प्रचारात सहभाग या सर्व बाबी कायमच धनंजय मुंडे यांच्या स्थानिक सत्तेच्या समीकरणात जमेच्या बाजू ठरलेल्या आहेत. शिवाय कार्यकर्त्यांमध्ये मिसळून प्रत्येक निवडणूक आपली स्वतःची आहे असे समजून धनंजय मुंडे जे काम करतात, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांत उत्साह कायम वाढत राहतो, असेही दिसून येते.
त्यांच्या विजयासाठी माझेही शंभर टक्के प्रयत्न माझ्या निवडणुकीत जे कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेऊन माझ्या विजयासाठी प्रयत्न करतात त्यांच्या निवडणुकीसाठी ही मी तितकेच प्रयत्न केले पाहिजेत म्हणूनच आज या ठिकाणी मी पूर्ण वेळ थांबणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी नंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.