बीड - परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रा समारोप सभेत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाषणातून खरपूस समाचार घेतला. भुजबळ म्हणाले की, मी घाबरणार नाही. जगेल तर सिंहा सारखा जगेल. आपण काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काय बोलायचे ते शिकायचे का? फडवणीसांना माझ्या कुठल्या भाषणाचा राग आला, हे त्यांनी सांगावे. अहो, मी ज्यावेळी मुंबईचा महापौर, आमदार होतो, त्यावेळी तुम्ही शाळेत होता, हे लक्षात ठेवा आणि आता मी काय बोलावे हे तुमच्याकडून शिकायचे का ? असा उपरोधात्मक प्रतिप्रश्न भुजबळ यांनी फडणवीस यांना विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आयच्या संयुक्त जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, आ.रामराव वडकुते, पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, रजनी पाटील, सुमन आर.आर.पाटील, पद्मसिंह पाटीलांसह दिग्गज नेते उपस्थितीत होते. या समारोप सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले. वारे शासन तेरा खेल, न्याय मांगा, मिला जेल, असे म्हणत मी नकलाकार आहे. तर एवढी धडकी का भरली, असा प्रश्नही भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. तसेच मी ज्यावेळी मुंबईचा महापौर होतो, मुंबईत आमदार होतो. त्यावेळी आपण शाळेत होता अन् आता मी काय बोलायचं हे तुमच्याकडून शिकायचं का ? असा प्रश्नही भुजबळ यांनी फडणवीस यांना विचारत त्यांच्यावर टीका केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडून भुजबळ यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये काल छगन भुजबळ साहेबांवर टीका केली, ते म्हणाले ती भुजबळ यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही जामीनावर सुटले आहात. मी मुख्यमंत्र्यांना सांगू ईच्छीतो की तुम्ही मुख्यमंत्री असाल मात्र, आमच्या वाटेला जाऊ नका. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. अमित शाह तडीपार आहे, तुम्ही कोणावर आरोप करता? आधी 16 मंत्र्यांचे जे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले आहे, त्याची चौकशी करा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या अमित शहांच्या तडीपारीची आठवण करुन दिली.
दरम्यान, तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी किंवा गरिबांसाठी तुरुंगात गेला नव्हता. भ्रष्टाचार करून राज्याच्या तिजोरीतील पैसा स्वत:च्या तिजोरीत भरल्यानं तुमची रवानगी तुरुंगात झाली होती. तीन वर्ष तुम्ही तुरुंगात होता आणि अजूनही तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, हे विसरू नका. त्यामुळे किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, अशा कडक शब्दांत त्यांनी छगन भुजबळ यांनी 'शाळा' घेतली.