कडा (बीड ) : विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनीटांचा अवधी होता. एवढ्यात मोठी वावटळ आली आणि मंडपात घुसली. यामुळे पूर्ण मंडप उडाला. लाकडी, लोखंडी अँगल अंगावर पडल्याने २० ते २५ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर मंगळवारी दुपारी चौधरी आणि झांबरे याचा विवाह सोहळा होता. लग्नाला काही मिनीटांचा अवधी असल्याने आलेले पाहुणे व वऱ्हाडी लग्न मंडपात बसले होते. अचानक दोनच्या सुमारास जोरात वावटळ आली. ती मंडपात घुसल्याने मंडप उडाला आणि सगळी दाणादाण झाली. यातील लाकडी बल्ली अंगावर पडल्याने अनेक वऱ्हाडी जखमी झाले. त्यांना तात्काळ कडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मंडप उडाल्याने लग्न लावले मंदिरातनियोजित ठिकाणी दिलेला मंडप लग्न लागण्याच्या अगोदरच उडाल्याने मोठ्या प्रमाणावर दाणादाण झाली होती. परत लगेच दुरूस्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे बाजूच्या मंदिरात लग्न सोहळा पार पडला.
जखमींत या वऱ्हाडींचा समावेशछबु मारूती घुले, सुशीला राजेंद्र साके, मथुरा निवृत्ती कर्डिले, नंदाबाई कोंडिबा झांबरे, नवनाथ नामदेव शिंदे, पद्माबाई साके, जनाबाई अंबादास पांडुळे, लहू दशरथ गांगर्डे, वैशाली संदिप गोरे, वैशाली तरटे, रमेश बोडखे, मथुराबाई गांगर्डे, संगीता संजय बोडखे, यमुना बबन झांबरे, शिवानी अंकुश गुंड, आश्विनी शिंदे, रावसाहेब गजघाट आदींच जखमींत समावेश आहे. या जखमींवर कड्यासह नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.