संजय खाकरे/
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असली तरी अनेक विशेष रेल्वे गाड्या फुल्ल असल्याने मासिक पास सेवा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे नियमित ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे बंगळरू - नांदेडसह अन्य रेल्वे गाड्यांना रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार? असा प्रश्न प्रवाशांतून केला जात आहे.
परळी रेल्वे स्थानकातून रोज धावणाऱ्या औरंगाबाद - हैदराबाद, आदिलाबाद - परळी व पूर्णा - हैदराबाद या रेल्वे गाड्यांना मासिक पासची सुविधा आहे. बाकीच्या सर्व चालू असलेल्या रेल्वे गाड्या फुल्ल असल्याने मासिक पासची सुविधा नाही. त्यामुळे नांदेड - बंगळरू व बंगळरू - नांदेडसह अन्य रेल्वे गाड्यांना पासची सुविधा नसल्याने प्रवाशांची अडचण होत असून, भुर्दंड सहन करावा लागत आहे.
....
परळी स्थानकातून सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड - पनवेल, पनवेल - नांदेड, काकीनाडा - शिर्डी, शिर्डी - काकीनाडा, सिकंदराबाद - शिर्डी, शिर्डी - सिकंदराबाद, विजयवाडा - शिर्डी, शिर्डी - विजयवाडा, औरंगाबाद - हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद, बंगळूरू - नांदेड, नांदेड - बंगळूरू, कोल्हापूर - नागपूर, नागपूर - कोल्हापूर, कोल्हापूर - धनबाद, धनबाद - कोल्हापूर, आदिलाबाद - परळी, परळी - आदिलाबाद.
...
भुर्दंड किती दिवस सहन करायचा?
बंगळरू - नांदेडसह सर्व रेल्वे गाड्यांना मासिक पासची सुविधा करणे आवश्यक आहे. अनेक रेल्वे गाड्यांना मासिक पासची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा भुर्दंड किती दिवस सहन करायचा?
- अश्विन मोगरकर, सामाजिक कार्यकर्ते, परळी.
परळीहून गंगाखेडला रोज खासगी नोकरीनिमित्त येणे-जाणे करत आहे. काही रेल्वे गाड्यांना मासिक पासची सुविधा असल्याने आपल्याला येणे-जाणे करता येत आहे. कोरोना काळात पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद होत्या. तेव्हा मासिक पासची सुविधा नव्हती. त्या काळात एक वर्ष दुचाकीवरुन जावे लागले.
- नागनाथ स्वामी, विद्यानगर, परळी.
परळी येथून परभणीला कॉलेजच्या नोकरीनिमित्त जाणे-येणे करत आहे. रेल्वे गाड्यांना मासिक पासची सुविधा असल्याने परळीच्या ३०० लोकांना त्याचा फायदा होत आहे.
- प्रा. नागोराव पाळवादे, परळी.
...
औरंगाबाद - हैदराबाद, आदिलाबाद - परळी व पूर्णा - हैदराबाद या रेल्वे गाड्यांना मासिक पासची सुविधा आहे. बाकीच्या सर्व सुरु असलेल्या रेल्वे गाड्या फुल्ल असल्याने मासिक पासची सुविधा नाही.
- अरविंद कुमार, रेल्वे अधिकारी, वाणिज्य विभाग, परळी.
...